मयांक गांधी बद्दल

भारत देशाच्या मंगलमय भविष्याची आस घेऊन जगणारे मयांक गांधी आज राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. देशासाठी झोकून देणाऱ्या या मनस्वी नेत्याचे वेगळेपण म्हणजे त्यांचे वास्तवाचे भान कधीही सुटलेले नाही. समाजातील ‘नाही रे’ गटाच्या सक्षमीकरणासाठी आणि पर्यायाने देशाच्या खऱ्या विकासासाठी गेली अनेक वर्षे काम केल्यानंतर मयांक यांना आपल्या देशातील समस्यांची नेमकी नस अवगत झालेली आहे.

मयांक रमेश गांधी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५८ रोजी झालेला असून १९७७ मध्ये त्यांनी बी.एस्सी पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी बिझिनेस मॅनेजमेंटमधील डिप्लोमादेखील मिळवला आहे.

मयांक गांधी हे इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कोअर टीमचे सदस्य होते. या चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि समाजाच्या सर्व स्तरांत ही चळवळ पोचवण्याच्या कामी मयांक यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

माहिती अधिकार कायदा, नगरराज कायदा इ महत्वपूर्ण कायद्यांचा मसुदा तयार करण्याच्या कामी मयांक गांधी यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. विविध सरकारी खात्यांसाठी आणि संस्थांसाठी केलेले सादरीकरण, जनसभा यांच्या माध्यमातून मयांक यांनी या प्रक्रियेत उल्लेखनीय यश मिळवले. जनतेची ताकद हीच खरी ताकद असा मयांक गांधी यांचा विश्वास आहे. केवळ ५७००० रुपयांत मोहल्ला सभेच्या माध्यमातून लोकांच्या सहमतीने, अॅडॉल्फ डीसुझा यांना उमेदवार म्हणून निवडून देण्याचा पहिला यशस्वी प्रयोग मयांक यांनी करून दाखवला होता.

मुंबईच्या पुनर्विकासासाठी मयांक यांनी सातत्याने प्रयत्न केलेले असून क्लस्टर री-डेव्हलपमेंट संबंधातील महाराष्ट्र सरकारच्या गृहप्रकल्प धोरणाचा मसुदा तयार करण्यात त्यांचा वाटा आहे. ‘शहरांतर्गत पुनर्विकास’ या बाबत मयांक यांनी सुचवलेल्या कल्पना नियोजन आयोगानेदेखील स्वीकारलेल्या आहेत.

केवळ भारतातच नाही तर जगभरातील २३ शहरांच्या विकासासंदर्भातील मुद्द्यांवरही मयांक यांनी काम केलेले आहे. शहरांचे नियोजन या विषयावर काम करणाऱ्या शिकागो येथील जगातील सर्वात मोठ्या CTBUA या संस्थेच्या सल्लागार समितीवरही त्यांनी काम केलेले आहे.

उपेक्षितांसाठी काहीतरी करण्याच्या ऊर्मीतूनच मयांक गांधी यांनी ‘जागृत नागरिक मंच’ची स्थापना केली. त्याचप्रमाणे त्यांनी डॉ.जयप्रकाश नारायण यांचा ‘लोकसत्ता’ पक्ष आणि अण्णा हजारे यांचे ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन’ यासोबत मयांक गांधी यांनी काम केलेले आहे.

शरीर-मन-आत्मा या संकल्पनेबाबत सखोल अभ्यास करून मयांक यांनी आपली अध्यात्मिक बाजूही सक्षम केलेली आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील आयुर्वेद, योगसाधना आणि तत्वज्ञान यांचा त्यांनी विशेष अभ्यास केलेला आहे.

आम आदमी पार्टीच्या उदयानंतर मयांक गांधी हे आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनले असून त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. देशात शाश्वत परिवर्तन घडवून आणायचे असेल तर सामान्य जनता आणि विचारवंत यांनी एकजूट झाले पाहिजे असे मयांक गांधी यांचे मत आहे.